भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद हायस्कूल, भूम येथील चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय नासा परीक्षेसाठी निवड झाल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
जिल्हास्तरीय नासा परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अविष्कार माने (इयत्ता 7 वी), चंदन जगदाळे (इयत्ता 9 वी), अदिती मदने (इयत्ता 9 वी) आणि निरंजन माळी (इयत्ता 9 वी) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सातत्याने विविध स्पर्धा, उपक्रम आणि गुणवत्तावर्धक शैक्षणिक कार्यक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक तात्या कांबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन उच्च स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवावे, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
या यशामुळे जिल्हा परिषद हायस्कूल, भूमच्या शैक्षणिक वाटचालीला नवी उभारी मिळाली असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
