धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचे धक्कादायक चित्र समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 9 मराठीने या गंभीर प्रकाराला वाचा फोडल्यानंतर प्रहार दिव्यांग संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग निवासी शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या ताटात अन्न नसतानाही ते जेवण करत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा समोर आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तोंडचा घासही हिरावला जात असेल, तर हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली? असा संतप्त सवाल प्रहार दिव्यांग संघटनेने उपस्थित केला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध सुविधा आणि निधी उपलब्ध करून दिला जात असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या वाट्याला हालअपेष्टा येत असतील, तर या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
प्रहारचा इशारा : विद्यार्थ्यांच्या हक्कांशी खेळ खपवून घेणार नाही!
होर्टी येथील प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग निवासी शाळांना प्रहार संघटनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणारे भोजन, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि इतर मूलभूत गरजांची तपासणी केली जाणार आहे. तसेच शासनाकडून शाळांना मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर होतो आहे का, विद्यार्थ्यांना नियमानुसार सुविधा दिल्या जातात का, याचीही माहिती घेण्यात येणार आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव आढळून येईल, त्या शाळेविरोधात प्रहार दिव्यांग संघटना तीव्र आंदोलन उभारणार, असा इशारा जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी दिला आहे.
जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन
या संदर्भातील निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा सचिव महादेव चोपदार, सूर्यकांत इंगळे, संजयजी नाईकवाडी, नवनाथ कचार, बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रहार संघटनेने स्पष्ट केले आहे की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. केवळ कागदोपत्री सुविधा दाखवून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असेल, तर संबंधित प्रशासन आणि संस्थाचालकांना जाब विचारला जाईल.
“मूलभूत सुविधा नसेल तर आंदोलन अटळ”
“जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार सुविधा मिळाल्याच पाहिजेत. एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळल्यास त्या शाळेविरोधात आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी दिला. आता प्रहारच्या पाहणीनंतर जिल्ह्यातील दिव्यांग निवासी शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती समोर येणार असून प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी प्रहारचा एल्गार कायम राहणार; सुविधा मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार.
