धाराशिव (प्रतिनिधी)-  भूम शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा टेंडर रखडल्यामुळे शहराची स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी तसेच अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये नियमित कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्था प्रभावित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून, डास व विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा रखडलेला टेंडर तातडीने मार्गी लावून नियमित कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भूम शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक कार्यवाही करावी. शहरातील कचरा तातडीने उचलून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. 


 
Top