धाराशिव (प्रतिनिधी)- दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाला पाहून दगडफेक करत घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत एकूण 10 आरोपी निष्पन्न झाले आहेत.
दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील आरोपींवर पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असता आरोपींनी पोलिसांना पाहून पोलिस पथकावर दगडफेक केली आणि घटनास्थळावरून पसार झाले होते. सदरबाबत पोलीस ठाणे वाशी येथे गु.र.नं. 283/2026, कलम 310(4), 310 (5), 121, 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणी केली असता आरोपींकडे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले होते. घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतिमान केली. दरम्यान, दि. 9 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याच्या कारवाई दरम्यान रामा उर्फ बेल्या शंकर काळे (वय 23) आणि सरदार शंकर काळे (वय 28), दोघे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांसोबत मिळून सदर गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानंतर तपासात या गुन्हयातील एकूण 10 आरोपी निष्पन्न झाले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. प्रकाश औताडे, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, चापोह. नागनाथ गुरव, चापोह. रत्नदीप डोंगरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
