धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे,भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देणे,या उद्देशाने जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती देण्यात आली आहे.‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि ‘नालाखोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला गाळ सुपीकतेचा आधार ठरत असून,पाणीसाठ्याची क्षमता वाढण्याबरोबरच 938.90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
या योजनेंतर्गत जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग आणि जलसंधारण विभागामार्फत पाझर तलाव,साठवण तलाव,लघु प्रकल्प तसेच मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत. सन 2023-24 ते 2025-26 या कालावधीत जिल्ह्यातील 302 प्रकल्पांतून सुमारे 170.38 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. धरणातून काढण्यात आलेला हा गाळ 11 हजार 607 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गाळ टाकल्यामुळे सुमारे 13 हजार 138 हेक्टर एवढी खडकाळ व मुरमाड जमीन सुपीक झाली आहे.
धरणातून गाळ काढल्यामुळे धरणातील पाण्याची क्षमता 13150 टीसीएमने वाढली आहे. जलसंधारणाची ही कामे केवळ धरणातील पाणीसाठा वाढविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत.ज्या जमिनी मुरमाड व खडकाळ होत्या,त्या ठिकाणी गाळ टाकल्याने जमिनीची मशागत सुलभ झाली आहे.परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली आहे.एकीकडे धरणात अधिक पाणी साठू लागले. तर दुसरीकडे शेतजमिनीची सुपीकता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे.
163 गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0
‘जलयुक्त शिवार अभियान 2.0' अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात एकूण 163 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,वरिष्ठ भूवैज्ञानिक व विकास यंत्रणा आणि भूजल व जलसंधारण विभाग कार्यरत आहेत. जिल्ह्यात विशेष निधीअंतर्गत 1,374,तर अभिसरण अंतर्गत 5 हजार 545, अशी एकूण 6 हजार 919 कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांसाठी 76.14 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0' अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आजअखेर 6 हजार 692 कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे 3916.80 घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला असून, 938.90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.