वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुका विधीज्ञ मंडळाची सन 2026-27 ची सार्वत्रिक निवडणूक 15 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. पी. के. कोठावळे व ॲड. ए. एस. डोईफोडे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात आली.
अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष या तीन पदांसाठी अनुक्रमे ॲड. एस. एन. कावळे, ॲड. एम. एम. आखाडे आणि ॲड. के. एस. लगाडे यांचे प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, कोषाध्यक्ष पदासाठी ॲड. आर. आर. क्षीरसागर व ॲड. एस. के. कुरुंद यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने या पदासाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. विधीज्ञ मंडळातील एकूण 51 नोंदणीकृत मतदारांपैकी 40 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ॲड. आर. आर. क्षीरसागर यांना 16 मते, तर ॲड. एस. के. कुरुंद यांना 22 मते मिळाली. दोन मते 'नोटा'ला मिळाली. त्यामुळे कोषाध्यक्षपदी ॲड. एस. के. कुरुंद यांची विजयी निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. पी. के. कोठावळे व ॲड. ए. एस. डोईफोडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यामध्ये अध्यक्ष ॲड. एस. एन. कावळे, सचिव ॲड. एम. एम. आखाडे, उपाध्यक्ष श्रीमती ॲड. के. एस. लगाडे आणि कोषाध्यक्ष ॲड. एस. के. कुरुंद यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी विधीज्ञ मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी वाशी तालुका विधीज्ञ मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या विकासासाठी तसेच वकील बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
