भूम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी कार्यशाळेत शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम यांना तीन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व विस्तार कार्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मंगळवारी (दि. 18) आयोजित कार्यशाळेस विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. अश्विन रांजणीकर, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. योगिता होके-पाटील, डॉ. आनंद वाघ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत बीड, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांतील सुमारे 120 प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उत्कृष्ट विस्तार केंद्र, उत्कृष्ट प्राचार्य व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी अशा विविध श्रेणीतील एकूण 12 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चारही जिल्ह्यांना प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातून शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम यांना उत्कृष्ट विस्तार केंद्र पुरस्कार 2025-26 प्रदान करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांना उत्कृष्ट विस्तार केंद्र प्राचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर उत्कृष्ट विस्तार केंद्र कार्यक्रम अधिकारी पुरस्कार 2025-26 महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. श्यामसुंदर आगे व डॉ. नितीन पडवळ यांना प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक व विस्तार उपक्रमांची विद्यापीठाने दखल घेत महाविद्यालयाला हा बहुमान दिला आहे. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.
