तुळजापूर (प्रतिनिधी)-  विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे भेट देत श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते तुळजापूर येथे आले होते.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेषतः सध्या सुरू असलेल्या मंदिरातून बाहेर पडण्यासाठीच्या मार्गावरील पायऱ्यांच्या कामाची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच मंदिर परिसरातील ओवऱ्यांच्या सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. विकासकामांची प्रगती, काम पूर्ण करण्याचे नियोजन तसेच भाविकांना या कामांमुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली.

दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त श्रीकांत यांना कवड्याची माळ व श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top