तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापुरातील जुने बसस्थानक ते धाराशिव महामार्गादरम्यानच्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने पादचारी, भाविक तसेच वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ऐन श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असताना प्रमुख रस्त्यावरच अंधाराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जुने बसस्थानक ते धाराशिव महामार्ग हा तुळजापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहने मार्गक्रमण करतात. सध्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होते. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे पादचाऱ्यांना रस्ता व्यवस्थित दिसत नाही, तर वाहनचालकांनाही अंधारात पादचारी स्पष्टपणे दिसत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरील पथदिवे बंद असतानाही ते तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी नागरिक व भाविकांमधून होत आहे.


 
Top