धाराशिव (प्रतिनिधी)-   बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर यांनी केले. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील मराठी विभागाच्या वतीने ‌‘बहिणाबाईंच्या कविता' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन व सादरीकरण करून त्यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. छाया दापके (प्रभारी प्राचार्य) व प्रा. राजा जगताप (मराठी विभाग प्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. राजा जगताप यांनी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून जीवनाचे तत्त्वज्ञान अत्यंत साध्या, सहज आणि बोलीभाषेतील शब्दांत प्रभावीपणे मांडले असल्याचे सांगितले. त्यांच्या कविता ग्रामीण जीवन, कष्ट, नाती, संस्कार, निसर्ग आणि मानवी जीवनातील विविध अनुभव यांचे वास्तवदर्शी चित्रण करतात. अशिक्षित असूनही आपल्या जीवनानुभवातून त्यांनी दिलेले साहित्यिक योगदान मराठी साहित्यात अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या विविध कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या कवितांमधील जीवनदृष्टी, ग्रामीण संस्कृती, स्त्रीमन आणि मानवी मूल्ये यांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली बोबडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुवर्णा गेंगजे व प्रा. सुशेन जाधवर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top