भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील मुख्य गोलाई चौकात भूम पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. 24) राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या 78 वाहनधारकांवर कारवाई करून एकूण 54 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील वाढती वाहतूक आणि वाहनधारकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन लक्षात घेऊन भूम पोलीस ठाण्याच्या पथकाने मुख्य गोलाई चौकात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वाहन तपासणी मोहीम राबविली. भूम शहरासह तालुक्यातील विविध गावांतून तसेच इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली. वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच अन्य नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच संभाव्य अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांमध्ये काही प्रमाणात धाक निर्माण झाला आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बर्थडे, खांडे, अजित कवडे, योगेश यादव, शिवाजी बाराते, अमोल मोटे, नितीन जाधव, रवी कोरे, अमोल वाघमारे, टकले यांच्यासह भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

