तुळजापूर (प्रतिनिधी)- काक्रंबा जिल्हा परिषद गटात फिरत असताना आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी काक्रंबा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. यापुढे गुंडगिरीविरोधात लढा उभारणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आपली राजकीय ताकद वाढत असल्याने काही जणांकडून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “हा वाद राजकीय असून, माझ्या जीवाला धोका आहे,” असा दावा त्यांनी केला. या वेळी काही व्हॉइस रेकॉर्डिंग आणि व्हिडिओही त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर सादर केले.


‌‘मी तोंडपाणी करणारा कार्यकर्ता नाही'

“मी कोणाच्या दबावाला बळी पडणारा कार्यकर्ता नाही. खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करणारा माणूसही नाही. समाजाला कधीही बदनाम करणार नाही. मतदार आणि समाजातील लोकांसाठी कोणत्याही आर्थिक फायद्याच्या अपेक्षेने काम करत नसून, अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

मसला येथील व्यक्ती काक्रंबा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढविण्यासाठी कशी आली आणि ती निवडून कशी आली, याबाबतचा राजकीय राग मनात धरून आपल्याविरोधात वातावरण तयार केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काक्रंबा जिल्हा परिषद गटात आपले राजकीय वर्चस्व वाढत असल्यानेच विरोधकांकडून षडयंत्र रचले जात असल्याचे शिंदे म्हणाले. “माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मला संरक्षण देणे गरजेचे आहे. लवकरच गुंडगिरीचे आणखी पुरावे जनतेसमोर सादर करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. शिंदे यांच्या या आरोपांमुळे काक्रंबा जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

 
Top