तुळजापूर (प्रतिनिधी)- पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून 27 वर्षीय तरुणाचा दोघांनी मिळून खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावाजवळ घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद बाळू मस्के (वय 27, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई रुक्मिणी बाळू मस्के (वय 45) यांनी तामलवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता माळुंब्रा गावाकडे जाणाऱ्या महामार्गाजवळ अरविंद मस्के याला आरोपी विशाल वडणे व ओंकार वडणे (दोघे रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून जिवे ठार मारल्याचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी रुक्मिणी मस्के यांनी दि. 22 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 115(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, हत्येची पद्धत आणि आरोपींची भूमिका याबाबत तामलवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 
Top