धाराशिव (प्रतिनिधी)-  नगरसेवकांची सुरू असलेली पळवापळवी आणि पक्षांतराच्या राजकारणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सध्या सुरू असलेली नगरसेवकांची पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या प्रवृत्तीविरोधात संघर्ष करू,” असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर सत्तेचा आणि पैशाचा वापर करून लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप जाधवर यांनी केला. जनतेने ज्या उमेदवारांना निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी होणारी पक्षफोड आणि पळवापळवी ही लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच धक्का देणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

“शिवसेना आणि ठाकरे परिवाराशी अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे असंख्य शिवसैनिक आजही पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. पदे, सत्ता किंवा प्रलोभनांपेक्षा विचार आणि निष्ठेला महत्त्व देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आगामी काळात संघर्ष उभा करू,” असेही तानाजी जाधवर यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांच्या पळवापळवीच्या राजकारणाला जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी खचून न जाता संघटन मजबूत करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करून लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


 
Top