धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सक्रिय भूमिका बजावावी. प्रश्न केवळ निवेदन देण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी संघटनेने आक्रमकपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांनी केले.

धाराशिव  येथे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांनी जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसह संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, विविध शैक्षणिक अडचणी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.  आगामी काळात जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये संघटनेची बांधणी मजबूत करण्यासोबतच नव्या विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनेच्या आगामी वाटचालीचे ध्येय-धोरण स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज अधिक बुलंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांचे धाराशिव जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. बैठकीला युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, तुषार वाघमारे, आतिश वाघमारे, स्वप्निल कुलकर्णी, रणवीर इंगळे, पृथ्वीराज मुळे, अजित पवार यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top