तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर मधील एन. एस. एस. विभागामार्फत दि. 27/08/26 पासून एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्यात येणार असून, त्या झाडाची योग्य निगा व संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहणार आहे.
या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वाढदिवस केवळ आनंदाचा दिवस न राहता पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा दिवस ठरणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्यानजीकच्या दिवशी विविध फुलांच्या, फळांच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. लावलेल्या प्रत्येक झाडाला संबंधित विद्यार्थ्याचे नाव देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी आणि झाड यांच्यात भावनिक नाते निर्माण होऊन झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. कु. मोनिका भालशंकर या विद्यार्थी नीच्या हस्ते रोप लावून सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजनकर ओमप्रकाश, एन. एस. एस. प्रमुख प्रा. सुतार प्रसाद, आयक्युएसी प्रमुख डॉ.खुमणे डी.डी. कल्चरल प्रमुख प्रा. गंगणे विवेक, शिक्षक कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
