धाराशिव (प्रतिनिधी)-  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्रा. डॉ. बाबासाहेब मोरे यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ‌‘परजीवी नमुना विश्लेषण उपकरण' या अभिनव उपकरणाच्या अभिकल्पाची नोंदणी प्रमाणपत्रासह प्राप्त झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. संबंधित उपकरणाच्या अभिकल्पाची नोंदणी अभिकल्प क्रमांक 502748-001 अंतर्गत दिनांक 20 मे 2026 रोजी करण्यात आली असून, प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख 12 ऑगस्ट 2026 आहे. सदर अभिकल्पाची नोंदणी वर्ग 24-01 अंतर्गत करण्यात आली आहे. ‌‘परजीवी नमुना विश्लेषण उपकरण' या संशोधनाधारित उपकरणाच्या अभिकल्पासाठी प्रा. डॉ. बाबासाहेब मोरे यांच्यासह डॉ. प्रमोद परसराम गायकवाड, डॉ. मनोरंजना सिद्धलिंग निर्मले, डॉ. के. पुगळेंधी, डॉ. दत्ताराव चंपतराव देशमुख, डॉ. गुणवंती आरक आणि डॉ. संगीता भीमराव डोंगरे यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. शिक्षणाबरोबरच संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञानाच्या निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने हे पेटंट महत्त्वपूर्ण मानले जात आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाची भारत सरकारच्या स्तरावर झालेली अधिकृत नोंद ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीतील निश्चितच अभिमानाची बाब आहे.


 
Top