धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल दहा महिने अनवाणी पायाने राज्यभर फिरत संघर्ष करणारे शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांचा दहिफळ येथे ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (दि.2 ) सायंकाळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, हा सत्कार कोणत्याही एका व्यक्तीने नव्हे, तर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एक-एक रुपया जमा करून आयोजित केला. शेतकरी हितासाठी केलेल्या त्यांच्या त्याग, जिद्द आणि निस्वार्थ संघर्षाचा गौरव म्हणून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव भातलवंडे हे होते. यावेळी व्यासपीठावर दत्तात्रय बोरके, शशिकांत राठोड, प्रदीप सस्ते, सुरेश नाईकनवरे, लईक पटेल आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी अश्रुबा भातलवंडे एडवोकेट प्रवीण शिंदे, अनिल जाधव, दिनकर खुने, बालाजी डोंगे, रवींद्र लोमटे, गणेश गडकर, श्रीकृष्ण पाटील, माधव देशमुख, एडवोकेट मनोज थोरात, अजित माळी, जाकिर पटेल, पप्पू पाटील, श्यामसुंदर पाटील, हनुमंत लंगडे, वैभव काळे, किसन तवले, मोहन लोमटे, महेश पवार, नारायण भातलवंडे, हनुमंत काकडे, वैजनाथ मते, समाधान मते, बालाजी भातलवंडे, सुरेश मते, अभिजीत पाटील, मुकुंद भातलवंडे, श्रीकांत काकडे, किरण भातलवंडे, भाऊसाहेब सुतार, रंगनाथ डांगे, महादेव कांबळे, प्रशांत भातलवंडे, शेखर पाटील, सुभाष ढवळे, वाहेद पटेल, महेश धोंगडे, शंकर कदम, भास्कर पाचभाई, ज्ञानेश्वर मडके, अक्षय धाबेकर, राहुल धाबेकर, गणेश धाबेकर, ज्ञानदेव मडके, रामराजे पाटील, ज्ञानेश्वर गरड, रमेश गादेकर, राजेंद्र तोडकरी, जगदीश शिंदे, पांडुरंग मते, योगीराज पांचाळ, मज्जित पटेल, विष्णू जाधव, पिंटू शेळके, माधव पवार, प्रताप केसरे आदी पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयादशमीच्या दिवशी “शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,“ अशी प्रतिज्ञा करून संजय पाटील दुधगावकर यांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यांनी मागील चार वर्षांपासून शासन दरबारी वेळप्रसंगी रस्ता रोको, निदर्शने आंदोलने सातत्याने केली. तसेच विविध माध्यमांतून सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न लावून धरला. उन्हाळा, पावसाळा आणि विविध संकटांचा सामना करत त्यांनी तब्बल दहा महिने अनवाणी पायाने राज्यभर प्रवास केला. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत दहिफळ ग्रामस्थांनी त्यांच्या संघर्षाचा गौरव करण्यासाठी नागरी सत्काराचे आयोजन केले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेला हा सत्कार शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारा आणि संघर्षाचा सन्मान करणारा ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा पाटील यांनी त्यांच्या पायात बूट घालून दहा महिन्यांच्या प्रतिज्ञेची भावपूर्ण सांगता केली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला असून, टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांच्या संघर्षाला सलाम केला.

मनोगत व्यक्त करताना संजय पाटील दुधगावकर यांनी, “आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी शेतकऱ्यांशी कधीही बेईमानी करणार नाही,“ अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भविष्यातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी रणजीत वरपे व औदुंबर धोंगडे यांनी दुधगावकर यांच्या चिकाटीचे कौतुक करत, वैयक्तिक सुखसोयींचा त्याग करून त्यांनी उभारलेला संघर्ष जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, हा संघर्ष शेतकरी चळवळीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी संजय पाटील दुधगावकर यांना पुढील सामाजिक व शेतकरी हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी केलेला त्याग, जिद्द आणि संघर्ष हा शेतकरी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरत असून, दहिफळ येथे झालेला हा नागरी सत्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा अविस्मरणीय सन्मान ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 
Top