तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारत कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण मिरवतो; मात्र या कृषिप्रधान देशाचा कणा असलेला शेतकरीच आज संकटाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. तुळजापूर तालुक्यात अर्धा पावसाळा संपत आला तरी दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाले, बंधारे आणि जलसाठे कोरडेठाक असून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होत आहे. उत्पन्नच हातात येणार नसेल तर घरखर्च कसा भागवायचा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती एका वाक्यात सांगायची झाल्यास शेतकऱ्यांच्या तोंडी एकच सवाल आहे. ‌‘पोराचं शिक्षण, पोरीचं लग्न... आधीच सावकाराचं देणं; कसं करावं?' शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावरही या संकटाची झळ बसत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या फीपासून वह्या-पुस्तके, प्रवास आणि इतर खर्च भागवताना पालकांची दमछाक होत आहे. मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून कर्ज काढावे की घर चालवावे, असा पेच अनेक कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.

काही जण शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी शेती करतात, अशी टीका करतात. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सवाल आहे‌‘आमच्या अनेक पिढ्यांनी शेती केली; त्यांचं भलं झालं नाही आणि आमचंही होत नाही, मग शेतीत सुख कुठे आहे?' शेतकऱ्यांच्या मते शेती म्हणजे नशिबाचा जुगार झाला आहे. बियाणे घेताना धोका, खत घेताना खर्च, औषधांमध्ये फसवणुकीची भीती, मजुरीचा वाढता खर्च, वाहतुकीचा बोजा आणि बाजारात माल विकताना दराची अनिश्चितता... या सगळ्या चक्रात शेतकरी भरडला जात आहे.


34 पैकी 26 तलाव कोरडेठाक; पाणीटंचाईचे संकट गडद

पावसाने ओढ दिल्याने तुळजापूर तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, 34 लघू व साठवण तलावांमध्ये मिळून अवघा 2.83 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तब्बल 26 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला असून, ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. धाराशिव पाटबंधारे उप-विभाग क्रमांक 6 अंतर्गत येणाऱ्या तुळजापूर उपविभागातील प्रकल्पांची  सध्याचे  स्थिती समोर आली आहे. ही स्थिती भयावह या 34 प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 68.173 दलघमी असून, प्रत्यक्षात केवळ 1.932 दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.



मंगरूळ शाखेतील सर्व तलाव कोरडे

जलसिंचन शाखा मंगरूळ क्रमांक 23 अंतर्गत येणाऱ्या सहा प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा पूर्णपणे संपला आहे. मंगरूळ, कसई, यमाई, अरळी लघुपाटबंधारे, काळेगाव व कुंभारी साठवण तलावांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक असल्याची स्थिती आहे.


हरणी शाखेतही शून्य साठा

हरणी शाखा क्रमांक 25 अंतर्गत असलेल्या पाच प्रकल्पांचीही परिस्थिती चिंताजनक आहे. हरणी, इटकळ, दिंडेगाव आणि अरबळी आदी प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना आगामी काळात पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.


तामलवाडी शाखेची अवस्था बिकट

तामलवाडी शाखा क्रमांक 24 अंतर्गत 12 प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 1.70 टक्के उपयुक्त साठा आहे. सावरगाव साठवण तलावात सर्वाधिक 13.10 टक्के साठा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद आहे. तामलवाडी साठवण तलावात 4.55 टक्के, तर धात्री साठवण तलावात 4.36 टक्के साठा आहे. मात्र सांगवी, माळुंब्रा, काटगाव, गंजेवाडी, भारती, सांगवी-काटी, पिंपळा, केमवाडी, देवकुरळी व कदमवाडी आदी प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शून्यावर आहे.


तुळजापूर शाखेतही पाण्याची टंचाई

तुळजापूर शाखा क्रमांक 22 अंतर्गत 11 प्रकल्पांमध्ये मिळून 10.32 टक्के उपयुक्त साठा आहे. हंगरगा (तुळ) लघुपाटबंधारेमध्ये 6.95 टक्के, सिंदफळमध्ये 4.39 टक्के, आपसिंगमध्ये 2.33 टक्के, हंगरगा (तुळ) साठवण तलावात 5.01 टक्के आणि वडगाव (लाख) साठवण तलावात 5.29 टक्के साठा आहे.

मात्र बंचाई, मसला, खंडाळा, ढेकरी, तडवळ आदी प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे.


पाऊस लांबला तर संकट अधिक तीव्र

तालुक्यातील 34 पैकी तब्बल 26 प्रकल्प कोरडे पडल्याने ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या उपलब्ध असलेला अल्प जलसाठा किती दिवस पुरणार, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरसह पर्यायी उपाययोजनांची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

उपविभागीय अभियंता पी. टी. कल्याणकर यांनी 18 ऑगस्टच्या जलसाठा स्थितीचा अहवाल कार्यकारी अभियंता, धाराशिव तसेच तहसीलदार, तुळजापूर यांच्याकडे पुढील आवश्यक उपाययोजनांसाठी सादर केला आहे.

दरम्यान, तालुक्यातील बहुतांश तलाव तळाला गेल्याने आता आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह ग्रामीण जनतेचे लक्ष दमदार पावसा कडे लागले आहे.


 
Top