भूम (प्रतिनिधी)- नशिबापेक्षा कर्तृत्व मोठे याची प्रचिती भूम तालुक्यातील ईट येथील अरबाज वहाबखाँ पठाण या जिद्दी तरुणाने आपल्या दैदिप्यमान यशातून करून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत अरबाजची दुय्यम निबंधक, श्रेणी-1 तथा मुद्रांक निरीक्षक पदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने ईट गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत अरबाजने “जिद्द असेल तर दगडातूनही पाणी काढता येते” हे सिद्ध केले आहे. त्यांचे वडील ईट व परिसरातील खेड्यापाड्यात सायकलवरून पाव विकण्याचा व्यवसाय करत होते ,कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार न घेता, केवळ ऑनलाइन शिक्षण, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर अरबाजने यशाची एकामागून एक शिखरे सर केली.
त्याने आजवर सहाय्यक पोलीस निरीक्षक (2023), तलाठी (2024), सहाय्यक पोलीस निरीक्षक (2024), विक्रीकर निरीक्षक (2024), सहाय्यक (2024), एरिया प्रोजेक्ट ऑफिसर (2025) अशा विविध पदांवर यश मिळवले असून, आता दुय्यम निबंधक श्रेणी-1 (2026) हे प्रतिष्ठेचे पदही आपल्या नावावर केले आहे. सध्या मुंबई येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला अरबाज याचा प्रवास मात्र येथे थांबणारा नाही. हे केवळ स्टेशन असून, प्रवास अजून खूप मोठा आहे, अशी भावना व्यक्त करत त्याने आई-वडील व भावांचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या हे यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले. अरबाजच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कुटुंब व पत्रकार बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
