धाराशिव (प्रतिनिधी)-  व्यसनमुक्त समाज ही निरोगी, सक्षम आणि प्रगत राष्ट्राची गरज आहे. ड्रग्स, तंबाखू,मद्य यांसारख्या व्यसनांपासून युवकांसह प्रत्येक नागरिकाने दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारे ‌‘हर घर तिरंगा' अभियान नागरिकांच्या सहभागातून अधिक व्यापक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

राज्यात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‌‘हर घर तिरंगा' अभियानांतर्गत 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.  रॅलीमध्ये जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.एम.भंडे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, तहसीलदार मृणाल जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 750 विद्यार्थी व युवक,तसेच शासकीय कार्यालयांतील सुमारे 100 अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. हातात तिरंगा आणि देशभक्तीचा उत्साह घेऊन सायकल व ई-बाईकवरून सहभागी झालेल्या युवकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी येळाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. 



 
Top