भुम (प्रतिनिधी)- विद्यार्थी, शेतकरी तसेच गरजू नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला पंचनामा व अहवाल देण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन देऊन उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या नियमानुसार विद्यार्थी, शेतकरी व गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी पूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांसोबत उत्पन्नाचा पंचनामा करून प्रमाणपत्रासाठी अहवाल देण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व इतर गरजू नागरिकांना तहसीलदार कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, तालुका शाखा भूम यांनी दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी तहसीलदार, भूम यांना निवेदन देऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अहवाल देताना येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्याचेही काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संदर्भित परिपत्रकाचा उल्लेख करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राऐवजी अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारून उत्पन्न प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि इतर गरजू नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र वेळेत मिळून त्यांची शासकीय कामे सुलभ होतील, असे निवेदनात म्हटले आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित तहसीलदारांना अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारून उत्पन्न प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी भूम तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनासोबत संबंधित परिपत्रकाची प्रत जोडण्यात आली असून, नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल, धाराशिव एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष ॲड.मुशरफ सय्यद, युवक काँग्रेसचे मोईज सय्यद, व्ही जे एन टी तालुकाध्यक्ष महादेव जाधव काँग्रेसचे सरिपुत भोसले, माजी सरपंच अजिज शेख,दगडू वेदपाठक,युसूफ सय्यद,अस्लम बागवान सर्फराज मोगल आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top