तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहर हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक 972 मधील नगरपरिषद तुळजापूरच्या ताब्यातील 731 चौ.मी. जागेतून रात्रीच्या वेळी मुरूम/गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन करून टिप्परद्वारे वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी केला आहे.

सदर 731 चौ.मी. जागेचे भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन करण्यात आले असून, सन 1978 मध्ये तहसीलदार, तुळजापूर यांच्यामार्फत सदर जागेचा ताबा नगरपरिषद तुळजापूर यांना देण्यात आल्याचे पांढरे यांनी सांगितले.

सदर जागेबाबत वाद सुरू असतानाच नगरपरिषद तुळजापूरने दिनांक 30 जुलै 2026 रोजी संबंधितांना नोटीस बजावून बांधकामाचे काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले होते. नोटीसचे पालन न करता बांधकाम सुरू असल्याचा आरोप असून, त्याचबरोबर जागेतील मुरूम रात्रीच्या वेळी जेसीबी/पोकलेनच्या सहाय्याने काढून टिप्परद्वारे बाहेर नेला जात असल्याचे पांढरे यांनी म्हटले आहे.


“शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांवर कारवाई करा”

गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करण्यासाठी संबंधितांकडे वैध परवानगी, रॉयल्टी अथवा आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची महसूल विभागाने तात्काळ तपासणी करावी. अनधिकृत उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्यास उत्खननाचे प्रमाण निश्चित करून शासन नियमानुसार दंड, रॉयल्टी व इतर देय रक्कम वसूल करावी, तसेच संबंधित वाहने व यंत्रसामग्रीवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पांढरे यांनी केली आहे.


तहसीलदारांकडे तक्रार दाखल

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, मुरूम उत्खननाचे प्रमाण निश्चित करण्यात यावे, वाहतूक करणाऱ्या टिप्परची तपासणी करण्यात यावी आणि अनधिकृत उत्खनन आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी तहसीलदार तथा दंडाधिकारी, तुळजापूर यांच्याकडे करण्यात आली आहे.


“नगरपरिषदेच्या ताब्यातील जागेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जागेबाबत वाद सुरू असताना रात्रीच्या वेळी मुरूम काढला जात असल्यास प्रशासनाने डोळेझाक न करता तात्काळ कारवाई करावी. शासनाच्या मालमत्तेचे व महसुलाचे नुकसान होऊ नये, यासाठी दोषींवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे,” असे जयकुमार नागनाथ पांढरे यांनी सांगितले.

 
Top