कळंब (प्रतिनिधी)- वृद्ध कलावंत व साहित्यिकांना शासनाकडून देण्यात येणारे मानधन तातडीने वितरित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धाराशिव जिल्हा कार्यध्यक्ष ॲड. प्रवीण सुभाष यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णयानुसार वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधनासाठी समिती गठित करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक व इतर सदस्यांचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील लाभार्थी निवडीची प्रक्रिया समितीच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लाभार्थी निवडीसाठी अर्ज मागवून प्रत्यक्ष पाहणी करून पात्र लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून फेरनिवडीबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती मिळत असली, तरी जिल्हा परिषदेचा संबंध नसताना निवडलेल्या लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित ठेवणे योग्य नसल्याचे ॲड. यादव यांनी म्हटले आहे.
अल्प उत्पन्नाच्या घटकातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना मानधनाची नितांत गरज आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यांचे मानधन वितरण स्थगित न ठेवता तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. वृद्धापकाळात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा करणाऱ्या कलावंत व साहित्यिकांना शासनाच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागू नये. याबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.