मुरूम, (प्रतिनिधी)- येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्वापोटी मुरूम परिसरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. शनिवारी (ता. 15) महालिंगरायवाडी आणि येणेगुर येथे वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणी सिमेंट आसने (बाक) भेट देण्याचा स्तुत्य कार्यक्रम पार पडला.
महालिंगरायवाडी गावात ग्रामस्थांच्या सोयीसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सात सिमेंट आसने आणि 28 चिंचाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरानाळे, श्रीशैल बिराजदार, सचिव कमलाकर जाधव, संचालक अमृत वरनाळे, बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सिमेंट आसनांचे अधिकारिक हस्तांतरण ग्रामस्थांकडे करण्यात आले. याप्रसंगी महालिंगरायवाडीचे उपसरपंच शाहूराज जाधव, माजी उपसरपंच दत्तू जगताप, प्रवीण जाधव, गोविंद भुसार, विकास जाधव, विलास जाधव, किशोर चव्हाण, हिराजी पवार, बाबुराव रामतीर्थे, पुरुषोत्तम जाधव, श्रीकांत पाटील, बंकट कोंगळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणेगुर येथील प्रसिद्ध गणेश मंदिर व महादेव मंदिर परिसरात धार्मिक आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी विशेष कार्यक्रम झाला. येथील मंदिरांच्या परिसरासाठी आठ सिमेंट आसने तसेच 25 विविध प्रकारच्या प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरानाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पूर्ण झाला. यावेळी येणेगुर येथील बलराम गणेश मंडळाचे अध्यक्ष अमोलकुमार स्वामी, उपाध्यक्ष देवराज बिराजदार, सचिव सिद्धाराम हुलमजगे, सदस्य दयानंद संगशेट्टी, महेश मायनाळे, शिवाप्पा माळी, मल्लिनाथ हुलमजगे, सचिन स्वामी, योगेश पांचाळ आदींसह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. पतसंस्थेच्या या सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
