धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ 35 टक्केच पाऊस झाल्यामुळे, उपलब्ध असलेला मोजका पाणीसाठा पुढील 10 महिने अर्थात पुढील वर्षाच्या जूनपर्यंत अत्यंत काटेकोरपणे पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा, जलसंधारण विभाग तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची तातडीची बैठक घेऊन पाणी उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील पावसाची यंदाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 35 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 225 प्रकल्पांमधील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती अधिक चिंताजनक आहे. 17 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा 28 टक्के होता. यंदा याच तारखेला हा साठा केवळ 9 टक्के आहे. म्हणजेच, गेल्या वर्षी याच कालावधीत उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या केवळ 40 टक्के इतकाच साठा सध्या उपलब्ध आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोरपणे वापर करणे, आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. आतापासूनच योग्य नियोजन केले नाही, तर पुढील काही महिन्यांत जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजची परिस्थिती गंभीर आहे, पण योग्य नियोजनाने आणि सर्वांच्या सहकार्याने पुढील संकट टाळता येईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. प्रत्येक तालुका आणि गावातील उपलब्ध पाणीसाठ्याचा स्वतंत्र आढावा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा प्राथमिकतेने राखावा. आरक्षित पाण्याचा इतर कारणांसाठी अनियंत्रित वापर टाळावा आणि त्याचे कडक निरीक्षण करावे. पावसाची परिस्थिती सुधारली नाही तर संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून त्यांना प्राथमिक मदत, पर्यायी पाणी स्रोत आणि टँकरसेवा यांचे नियोजन करावे. पाणीसाठ्याचे नियमित निरीक्षण करून ताजे आकडे वेळोवेळी प्रकाशित करावेत, जेणेकरून जनतेला योग्य माहिती मिळेल असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
आजचे पाणी उद्यासाठी' नागरिकांना आवाहन
प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी 'आजचे पाणी उद्यासाठी' हा मंत्र आत्मसात करून ताबडतोब पाणी व्यवस्थापनाचे काम सुरू करावे. नियोजन आणि संयोजनात उशीर झाला तर ग्रामीण भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई अनुभवावी लागू शकते.
त्यामुळे नागरिकांनी स्थानिक तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या गावातील पाणी उपलब्धतेबाबत माहिती घ्यावी, पाण्याची नासाडी त्वरित प्रशासनाकडे कळवावी आणि घरगुती पाण्याचा वापर मर्यादित ठेवून सर्वांनी मिळून या संकटाचे प्रमाण कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.
