परंडा (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठात गीत सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, सहशिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या विद्यापीठातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले असून, त्यांनी आपल्या कार्यातून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे. आजही विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांमध्ये शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासामध्ये विद्यापीठाचे योगदान उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. “ज्ञान, समता आणि प्रगतीचा प्रकाश” हा विद्यापीठाचा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
