भूम (प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण काल भूम तालुक्यातील वंजरवाडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी आले असता भूम शहरातील गोलाई चौकात अक्की बर्वे व सुरेश कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच श्री एस. अकॅडमी येथेही रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या स्वागत कार्यक्रमाला जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांची उपस्थिती असल्याने भूमच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुरेश कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक लढवली असून, सध्या मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे. माझा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कांबळे यांनी सांगितले की, कालचा कार्यक्रम हा त्यांचा भाचा अक्की बर्वे यांच्या घराच्या वास्तूशांतीचा होता. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. पाहुणे म्हणून आलेल्या चव्हाण यांचा आदर म्हणून स्वागत व सत्कार करण्यात आला. मात्र, केवळ या कार्यक्रमातील उपस्थितीवरून राजकीय प्रवेशाबाबत लावण्यात येणारे अंदाज चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे कौतुक करताना कांबळे म्हणाले की, “रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम पाहता भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितच काम करण्याची इच्छा आहे.” सध्या आपण जनतेची कामे करत असून पूर्णवेळ जनसेवेसाठी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या राजकीय व सामाजिक प्रवासाबाबत बोलताना कांबळे यांनी अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी मला मदत केली, त्यांना मी कधीही विसरणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच अजितदादा पवार असते तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी दिसली असती, असेही त्यांनी नमूद केले.

भूम शहरालगत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विकासाचा मुद्दाही कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला. भूम एमआयडीसीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असून, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून या प्रश्नांवर भविष्यात प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भूम एमआयडीसीच्या विस्तारासोबतच रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास स्थानिक पातळीवर उद्योग व रोजगाराच्या संधी वाढू शकतात. त्यामुळे या प्रश्नांसाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही कांबळे यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.

रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना सुरेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सध्या पूर्णविराम मिळाला असला, तरी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. विशेषतः “सध्या भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही; मात्र भविष्यात संधी मिळाल्यास काम करण्याची इच्छा आहे,” या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.यावेळी जय हनुमान ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top