धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीनंतर या पथकाने तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची आणखी एक पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी माळुंब्रा येथे तारा प्रकल्पासह हवाई धावपट्टी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी मागील काही महिन्यानपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित धावपट्टीची जागा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या सलग्न असल्याने मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. कृषी मालाची जलद वाहतूक, औद्योगिक गुंतवणुकीला चालना तसेच तुळजापूर आणि परिसरातील पर्यटनविकासासाठी ही धावपट्टी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारला जाईल. त्यानंतर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला तसेच दरडोई उत्पन्नवाढीसही मोठा हातभार लागणार असल्याची अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

या पाहणीमध्ये भारतीय विमान प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास आणि राजेश जीवन यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे, महापारेषणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता गायत्री काळे, उमेश मेहरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता आवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित हवाई धावपट्टी आणि धाराशिव विमानतळाचा नियोजित विकास यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवे बळ मिळण्यासोबतच कृषी, उद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे अपेक्षा आहे.


धाराशिव विमानतळ येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र 

माळुंब्रा येथील पाहणीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने धाराशिव येथील हवाई धावपट्टीचीही पाहणी केली. या धावपट्टीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय धाराशिव विमानतळावर मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या घेणे, भविष्यात ड्रोन निर्मिती तसेच संशोधन केंद्र विकसित करण्याचेही प्रस्तावित आहे. त्यामुळे माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टीसोबतच धाराशिव विमानतळाच्या विकासातून जिल्ह्यात विमान वाहतूक, ड्रोन तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 
Top