धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते बेंबळी पंचायत समिती सदस्य मोहन अप्पा वाघुलकर, गोवर्धनवाडी पंचायत समिती सदस्य सुशील पांडुरंग काकडे, चिखली पंचायत समिती सदस्य सुरेश प्रकाश कोळी तसेच शिवसेना ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख हाजी मोईन खान यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, या प्रवेशामुळे ग्रामीण भागातील पक्षसंघटनेला मोठी ताकद मिळणार आहे. विविध भागातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे शिवसेनेची जनाधाराची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सर्वांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वतीने आणि शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
