धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील महाळंगी येथील जागृत देवस्थान म्हणून भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि.5 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी झाली होती. यात्रेत आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक प्रशांत साळुंके यांच्या शेतात मशागतीसाठी खोदकाम करताना श्री महालक्ष्मीची मूर्ती आढळून आली होती. मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करुन भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. या देवीच्या दर्शनासाठी येणारे हजारो भाविक नवस बोलतात आणि संततीप्राप्ती झालेले दांपत्य येथे नवसपूर्तीसाठी येतात, अशी माहिती प्रशांत साळुंके यांनी दिली. आषाढ पाणी यात्रेनिमित्त दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी देवींची मूर्ती व पालखीचे पुजाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मानकरी भारत ढवळे यांच्या निवासस्थानापासून पालखीचे वाजत गाजत मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांचे नवसपूर्ती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. या यात्रेत महाळंगीसह चिखली, रूईभर, आंबेवाडी, बेंबळी व पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. यात्रेत आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
