धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि विविध शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थी आकर्षक गणवेशात उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीने झाली. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “भारतीय स्वातंत्र्यदिनाचा विजय असो” अशा देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर प्रथम वंदे मातरम्, त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थिनींनी “संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद करून अभ्यास करावा” असा संदेश देणारी सामाजिक व शैक्षणिक आशयाची सुंदर नाटिका सादर केली. या नाटिकेतून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, अभ्यासाचे महत्त्व आणि मोबाईल-टीव्हीचा मर्यादित वापर याबाबत प्रभावी संदेश दिला. यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य तसेच लेझीम पथकाने सादर केलेले आकर्षक लेझीम नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध हालचाली, तालबद्ध लेझीम आणि देशभक्तीच्या उत्साहाने उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाप्रती असलेली आपली जबाबदारी यांची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी पौळ, उपाध्यक्षा सौ. अफसाना शेख, सदस्य श्री. निलेश देशमुख, सौ. अनिता पौळ, माजी सरपंच श्री. संतोष बप्पा चौगुले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. श्याम बापू लावंड, पोलीस पाटील श्री. प्रमोद माळी, ग्रामपंचायत सदस्य श्री. हरिदास म्हेत्रे, श्री. सुनील काळे तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती कुदळे, गायकवाड, साळुंके यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश पेठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. हनुमंत माने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक श्री. दीक्षित राजेंद्र, श्रीमती नवले जनाबाई, श्रीमती कदम सखुबाई, श्रीमती इंगळे सुमन, श्रीमती वीर राधाबाई, श्रीमती मुपडे स्वाती, श्रीमती सावळकर महादेवी व श्रीमती भंडारे नेहा यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर्ण सहभागामुळे आणि विविध उपक्रमांमुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

 
Top