धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतातील पहिल्या ' कायदेविषयक मदत केंद्रा'चे मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव न्या.भाग्यश्री पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग देवेंद्र कटके, इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या शिला पठत, अधीक्षक श. सं. कल्याणशेट्टी, तत्त्वशील कांबळे, ॲड. ए. ए. पाथ्रुडकर ,मिथुन जोगदंड, प्रशांत मते, ॲड. हेमंत कठारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पहिले कायदेविषयक माहिती देणारे केंद्र सुरू केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्रासाठी कार्यालयात एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली आहे. हे केंद्र विविध असुरक्षित घटकांसाठी, विशेषतः 'वेठबिगारी' प्रथेला बळी पडलेल्यांसाठी समर्पित असेल. तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कायदेविषयक मदत केंद्र, बालमजुरी याविषयी कायदेविषयक मदत केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मदत केंद्र ,बालकांसाठी व मानसिक विकलांगासाठी कायदेशीर मदत केंद्र, अशा विविध अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत केंद्राचे झाले आहे. या केंद्रासाठी विशेष वकिलांची (पॅनेल लॉयर्स) व अधिकार मित्र यांची नियुक्ती केली आहे भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच आणि अभिनव उपक्रम आहे.