तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खजूर व नारळ निविदा प्रक्रियेत खोटी बँक सॉल्व्हन्सी अप्रमाणपत्र देणाऱ्या निविदा धारकवर कारवाई करण्याची मागणी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे खजूर व नारळ ईलिलाव प्रक्रियेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये काही निविदाधारकांनी संशयास्पद अथवा खोटी बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रे सादर केल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रांबाबत संबंधित बँकेकडून आवश्यक पुरावा अथवा अधिकृत खात्री प्राप्त झालेली असतानाही, मंदिर संस्थानकडून संबंधित निविदाधारकांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संशयास्पद कागदपत्रे सादर झाल्यानंतरही कारवाई न करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. याबाबत संस्थान प्रशासनाने स्पष्ट खुलासा करण्यात यावा निविदा प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे ही संबंधित अधिकारी व निविदा प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात कर्तव्यात निष्काळजीपणा अथवा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी.
तसेच, निविदा प्रक्रियेत संशयास्पद कागदपत्रे सादर करणाऱ्या निविदाधारकांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खोटी माहिती सादर करणाऱ्या नीविदा धारकवर तात्काळ कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे.