भूम (प्रतिनिधी)- मराठवाडा लोककला विकास मंडळ व मराठवाडा वृद्ध साहित्यिक कलाकार संघटना, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 सप्टेंबर 2026 रोजी भूम येथे जिल्हास्तरीय लोककलावंत मेळावा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध लोककला स्पर्धांसह भजनी मंडळ व आराधी मंडळांच्या स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील लोककलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
यश मंगल कार्यालय, परंडा रोड, भूम येथे सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत विविध कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून मराठवाडा वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन निवड समितीचे अध्यक्ष किर्तिकरण पुजार साहेब उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास भूमचे तहसीलदार जयवंत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गटविकास अधिकारी एल. आर. वाजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्जेराव इंदलकर, अध्यक्ष, मराठवाडा लोककला विकास मंडळ तसेच ह.भ.प. धर्मदूत अरुण महाराज शाळू, भूम यांची उपस्थिती राहणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भजनी मंडळ स्पर्धा, तर दुसऱ्या दिवशी आराधी मंडळ स्पर्धा होणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक संचामध्ये किमान सात कलाकार असणे आवश्यक असून सहभागी कलाकारांनी स्वतःचे साहित्य आणणे, तसेच कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील पारंपरिक लोककला, भजन, आराधी व विविध लोककलांना व्यासपीठ मिळणार असून ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव व त्यानंतर आभार प्रदर्शन असा कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
कार्यक्रमासाठी ह.भ.प. पुरुषोत्तम गजरे महाराज उळूप, महादेव महाराज नरके वांगी आणि मारुती वाघ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. तर विशेष अर्थसहाय्य डॉ. अर्जुन भारती यांचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोककलावंतांनी या महोत्सवात सहभागी होऊन पारंपरिक लोककलेच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.