तुळजापूर (प्रतिनिधी)- भाविक नागरीक महिला, मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे तुळजापूर शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पात कॅमेरे चुकीच्या ठिकाणी बसविले असतील,व चुकीची कंपनी निवडली असेल किंवा देणे-घेण्यात काही गैरप्रकार झाला असेल, तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. असा इशारा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सीसीटीव्ही लोकार्पण सोहळ्यात दिला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक पानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, तहसीलदार अरविंद बोळंगे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चोरमले, तहसीलदार माया माने, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले, तुळजापुरात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे उभारल्यामुळे पोलिसांची जबाबदारीही वाढली आहे. धाराशिव जिल्हाभर सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याच्या कामाची सुरुवात तुळजापूर या तीर्थक्षेत्रातून झाली आहे. शहरात सुमारे 10 कोटी रुपये खर्चून 62 ठिकाणी 233 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, मुला-मुलींसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. गुन्हेगारांसाठी हे कॅमेरे इशारा ठरतील. त्यामुळे तुळजापूर सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होण्यास मदत होईल, असे सरनाईक यांनी सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्र हा आपला संकल्प आहे. तुळजापुरातील ड्रग्जचे वाढते संकट रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी. ड्रग्ज विकणारे तसेच त्याचे सेवन करणारे आढळून आल्यास त्यांना पकडण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. प्रारंभी प्रास्ताविक पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले.
