धाराशिव (प्रतिनिधी)- औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पं. विष्णू नारायण भातखंडे संगीतरत्न पुरस्कार मराठवाड्यातील ज्येष्ठ संवादिनी वादक पं. दीपक लिंगे यांना रविवारी पं. भातखंडे संगीत समारोहात सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. शिवरुद्र स्वामी, सचिव व्यंकटराव राऊतराव, विठ्ठलराव जगताप, .राम बोरगावकर, कोशाध्यक्ष हणमंत लोकरे, नरसिंग राजे,  वेदांग धाराशिवे, मन्मथ पाटील, नागनाथ पाटील, यांची उपस्थिती होती. धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कुल येथे संगीत विभाग प्रमुख म्हणून 34 वर्ष अध्यापनाची सेवा केली. अनेक विद्यार्थी संगीत विशारद, अलंकार आहेत. मुंबई, हैदराबाद, बंगलोर, सिंगापूर येथे काही शिष्य अध्यापनाचे कार्य करत आहेत. भारतातील महत्वाच्या संगीत महोत्सवमध्ये हार्मोनियम साथसंगत केली आहे. लखनऊ, भोपाळ, इंदोर, अलाहाबाद येथील आकाशवाणी, दूरदर्शन केंद्राच्या सांगीतिक कार्यक्रमात हार्मोनियम वादन केले आहे. साथसंगत मध्ये लिंगे यांनी पंडीत राजन साजन मिश्रा, पंडीत बसवराज राजगुरू, डॉ.वसंतराव देशपांडे, पंडीत जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, गणपती भट,बेगम परवीण सुलताना, देवकी पंडीत, बकुल पंडित, विना सहस्त्रबुद्धे  अशा नामवंत कलाकारांना हार्मोनियमची साथ संगत केली आहे.

 
Top