वाशी (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्या हस्ते सकाळी विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी वाशी शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की जय आणि वंदे मातरम्‌‍च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते. राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत वाशी तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 
Top