धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत 41 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या पंधरवड्याचा उद्घाटन समारंभ 25 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील यांनी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेत्रशल्यचिकित्सक डॉ. ज्योती कानडे यांनी मरणोत्तर नेत्रदानाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.नेत्रदान म्हणजे काय, नेत्रदान कोण करू शकतो, नेत्रदानाची आवश्यकता व महत्त्व, नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज तसेच कोणाला नेत्रदान करता येत नाही, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या नातेवाईकांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सुरेश शेळके, श्रीमती लक्ष्मी माने आणि राजेश तोष्णीवाल यांचा समावेश होता. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. धनंजय चाकुरकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीला डोळ्यांची गरज किती असते, हे एखाद्या अंध व्यक्तीला विचारावे. कोणत्याही कारणामुळे अंधत्व आले तर दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्याची सुरुवात स्वतःपासून करावी.
नेत्रदानाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊन प्रत्येक कुटुंबाच्या ज्या प्रथा-परंपरा असतात,त्याप्रमाणे मरणोत्तर नेत्रदान हीदेखील कौटुंबिक प्रथा बनली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.नेत्रदान आणि अवयवदान ही एक चळवळ समजून प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग वाढविणे गरजेचे आहे.सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नेत्रविभागाचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील,डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ. ज्योती कानडे, डॉ.पवन महाजन, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,श्रीकांत कल्याणी,उमेश गोरे, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज श्रीमती वहीदा शेख तसेच नेत्रविभागातील सर्व नर्सिंग स्टाफ, वर्ग-4 कर्मचारी,रुग्णालयातील रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नेत्रविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. महेश पाटील यांनी केले.
