भूम (प्रतिनिधी)- तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणारे उत्पन्न प्रमाणपत्र गेल्या दहा दिवसांपासून रखडल्याने भूम तालुक्यातील विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलती तसेच विविध शासकीय योजनांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असताना प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.
उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यासाठी तलाठ्यांचा उत्पन्न अहवाल आवश्यक असतो. मात्र, उत्पन्न निश्चित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून स्पष्ट व सर्वसमावेशक निकष निश्चित करण्यात आलेले नसल्याने तलाठी व मंडळ अधिकारी उत्पन्नाचे अहवाल देण्याबाबत अडचण व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जवळपास ठप्प झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात तलाठी व उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये बैठकही झाली. मात्र, बैठकीनंतरही प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे दिसून येत आहे. तलाठी संघटनेच्या म्हणण्यानुसार शेतकरी, पेन्शनधारक तसेच आयटीआर भरणारे नागरिक यांचे उत्पन्न निश्चित करण्याबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याने त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच पगारपत्रक असलेल्या नागरिकांनाही प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती आहे.
मात्र, मजुरी करून उदरनिर्वाह करणारे, छोटे-मोठे व्यवसाय करणारे किंवा नियमित पगारपत्रक अथवा आयटीआर उपलब्ध नसलेले सर्वसामान्य नागरिक यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा नागरिकांचे उत्पन्न नेमक्या कोणत्या निकषांवर निश्चित करायचे, याबाबत स्पष्टता नसल्याने त्यांचे प्रमाणपत्र रखडत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची तातडीने गरज असतानाही ते वेळेत मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तलाठ्यांचा अहवाल आवश्यक असला तरी उत्पन्न अहवाल तयार करण्यासाठी स्पष्ट निकष नसल्याने तलाठी व मंडळ अधिकारी अहवाल देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वयंघोषणेच्या आधारे उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी भूम तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने केली आहे.