तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात आदी परराज्यांत नोंदणी झालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स व टुरिस्ट बस महाराष्ट्रात येऊन स्थानिक प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचा रोड टॅक्स व परमिट शुल्क न भरता धाराशिव जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

परराज्यात नोंदणीकृत व्यावसायिक वाहने महाराष्ट्रात व्यवसाय करूनही राज्याचा कर व परमिट शुल्क टाळत असल्याने शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून कर व विविध शुल्कांची नियमित पूर्तता केली जात असताना परराज्यातील वाहनांमुळे स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, हॉटेल परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये परराज्यातील व्यावसायिक वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी. कर व आवश्यक परवाने न भरता व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून, गरजेनुसार वाहने जप्त करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच अशा वाहनांकडून जिल्ह्यात प्रवासी चढ-उतार करण्याबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि करण्यात आलेल्या कारवाईचा साप्ताहिक अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने लक्ष घालून महाराष्ट्र शासनाचा महसूल तसेच स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत 15 दिवसांत लेखी उत्तर द्यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सचिव धनाजी साठे, शहर उपाध्यक्ष समीर शेख, राहुल गायकवाड यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.


 
Top