तुळजापूर (प्रतिनिधी)- काक्रंबावाडी गावात  पाऊस नसताना चिखलमय झालेले रस्ते ठिकठिकाणी साचलेला कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील घाणीच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. एकीकडे स्वच्छ गावाचे चित्र उभे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात काक्रंबावाडीत ‌‘घाणीचे साम्राज्य' निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

गावातील विविध भागांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. कचऱ्याचे नियमित संकलन आणि विल्हेवाटीची व्यवस्था प्रभावीपणे होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही दुर्लक्ष?

गावातील अस्वच्छतेबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा उचलण्याची मागणी करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तक्रारी केल्यानंतर काही काळ स्वच्छता केली जाते; मात्र पुन्हा परिस्थिती ‌‘जैसे थे' होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.


नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कशासाठी?

कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छ परिसरामुळे माशा, डास तसेच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केवळ कचरा उचलण्याची औपचारिकता न करता गावातील स्वच्छतेसाठी नियमित आणि शाश्वत व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.


स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे?

ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेसाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणा, कर्मचारी आणि निधीचा योग्य वापर होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कचरा संकलनाची नियमित वेळापत्रकानुसार व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, नाल्यांची स्वच्छता आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

गावातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जर परिस्थितीत बदल होत नसेल, तर ग्रामस्थांनी नेमके कोणाकडे दाद मागायची? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता मोहीम राबवावी आणि कचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.काक्रंबावाडीतील घाणीचे साम्राज्य दूर करून ग्रामस्थांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणार कधी? याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे. आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

 
Top