तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटे श्री तुळजाभवानी मातेच्या समोर नागदेवतेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी नागदेवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली.
नागपंचमीच्या निमित्ताने महिलांनी नागदेवतेची मनोभावे पूजाअर्चा करून सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी पाच ते सहा या वेळेत माहेरी आलेल्या सुहासिनी महिलांनी श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने फेर धरत गाणी म्हटली. फेरातील पारंपरिक गाणी, महिलांचा उत्साह आणि भक्तिभाव यामुळे मंदिर परिसरात नागपंचमीच्या उत्सवाला आगळेच स्वरूप प्राप्त झाले. महिलांनी एकमेकींसोबत आनंदोत्सव साजरा करत नागपंचमीची परंपरा जपली.
तुळजापूर शहराबरोबरच तालुक्यातील विविध गावांमध्येही नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी असलेल्या वारुळांचे महिलांनी विधिवत पूजन केले. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून नागदेवतेचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागपंचमीची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ग्रामीण भागातील नागपंचमीच्या पारंपरिक प्रथा, वारुळ पूजन आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे गावागावांत सणाचे उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. तुळजापूरच्या धार्मिक परंपरेसोबतच ग्रामीण संस्कृतीतील नागपंचमीच्या प्रथा यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या.
