परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयातील परंडा तालुक्यात यावर्षी अत्यंत अल्प पाऊस पडला असुन परंडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी साठा 0% असुन प्रकल्प पुर्णपणे कोरडा आहे. चांदणी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच पडला नसल्याने या प्रकल्पात पाणी आलेले नाही. परंडा तालुका हा सातत्याने अवर्षणग्रस्त व दुष्काळी तालुका असुन चालु वर्षीही तालुक्यात पावसाचे प्रमाण नगन्य आहे. यामुळे तालुक्यातील गावांना आणि शेतकऱ्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असुन पुढे तीव्र दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

चांदणी मध्यम प्रकल्पातुन सोलापुर जिल्हयातील बार्शी शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या चांदणी प्रकल्पात पाणीसाठा 0% असल्याने बार्शी शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेतुन चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडणे शक्य असुन यापुर्वी असे पाणी सोडण्यात आले होते. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन या धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तरी उजनी धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू असताना बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यात यावे तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतुन पाणी सोडुन परिसरातील पाझर तलाव भरून घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे अशी मागणी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 
Top