तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था (साखर), धाराशिव यांच्या कार्यालयाच्या पदभारातील एकूण 15 सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी 14 कारखान्यांनी विहित नमुन्यात स्वाक्षरीसह साखर साठ्याची माहिती सादर केली आहे. 31 जुलै 2026 अखेरच्या आकडेवारीनुसार उपलब्ध नोंदीनुसार या कारखान्यांकडे एकत्रित सुमारे 90651. 55 मेट्रिक टन साखरेचा साठा आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, नॅचरल शुगर इंडस्ट्रीज लि., रांजणी या कारखान्याकडे सर्वाधिक 31 हजार 421.550 मेट्रिक टन साखर साठा आहे. त्याखालोखाल राजगंगा शुगर मिल प्रा. लि., समुद्राळ येथे 25 हजार 422 मेट्रिक टन, तर तुळजापूर तालुक्यातील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., मंगरूळ येथे 18 हजार 157.4 मेट्रिक टन साखर साठा असल्याची नोंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव येथे 11 हजार 658.8 मेट्रिक टन साठा असल्याचे नमूद आहे. तसेच लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज, खेड येथे एकूण 2 हजार 602.9 मेट्रिक टन साठा असल्याची नोंद आहे. भैरवनाथ शुगर वर्क्सच्या विविध युनिटमध्येही साखरेचा साठा असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. तेरणा सहकारी साखर कारखाना, ढोकी येथे 7.9 मेट्रिक टन, भैरवनाथ शुगर वर्क्स, परंडा येथे 289.1 मेट्रिक टन, शिवशक्ती सहकारी साखर कारखाना, वाशी येथे 97.6 मेट्रिक टन, तर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, मुरूम येथे 994.300 मेट्रिक टन साठा नोंदविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यातील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज संचलित श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग याची साखर साठ्याची माहिती अहवालात ‌‘माहिती अप्राप्त' अशी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कारखान्याकडील साखरेचा प्रत्यक्ष साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्याच्या एकूण साठ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयान शुगर लि., डी.डी.एन.एस.एफ.ए. लि., भिमाशंकर शुगर मिल्स प्रा. लि., धाराशिव साखर कारखाना मर्या. चोराखळी आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लि. क्रमांक 7, इंदापूर या ठिकाणी साखर साठा शून्य असल्याची नोंद अहवालात आहे.

 
Top