धाराशिव (प्रतिनिधी)- सध्याच्या डिजिटल युगात घरफोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु सायबर गुन्ह्यांतून आर्थिक गुन्हेगारी वाढली आहे. यासाठी नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करायला हवेत. असे प्रतिपादन प्रसिध्द सायबर सुरक्षातज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले.
जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी या विषयावर बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले की, मोबाईलचे डाटा कनेक्शन चालू ठेवू नये. कारण त्या माध्यमातून तुमची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येण्याचा जास्त संभव असतो. सायबर ढगांना यातून पैसे लुटण्याची संधी मिळते. डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नसतो. परंतु सायबर सायबर ठगांची मानसिकता ओळखून विशेष प्रकारातून तो घडवतात आणि पैसे लुबाडतात. त्यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध दाखवले व त्यावर आपण काय काळजी घ्यावी, याबाबत तपशीलवार सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांच्या विविध समस्यांची व प्रश्नांची समर्पक उत्तरे देवून त्यांच्या शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस ज्येष्ठ उद्योजक रवींद्र साळुंखे व डॉ. अभय शहापूरकर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत माधव, कैटचे प्रदेश उपाध्यक्ष संजय मंत्री, मराठवाडा चेबरचे सहसचिव धनंजय जेवळीकर यांनी देशपांडे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभिलाष लोमटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन नायर, शैलेश शहा, विशाल थोरात, अविनाश काळे, अजहर खान यांनी परिश्रम घेतले.

