धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला, धाराशिव आणि स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास अण्णासाहेब जाधव, दिलीप गणेश, ॲड. सुग्रीव नेरे, जयकृष्ण गरड, अरुण माडेकर, बालाजी जाधव, धनंजय माळी, इंद्रजीत काळूंके, जाहिदा शेख यांच्यासह धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिरमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी ॲड. सुग्रीव नेरे यांनी आपल्या मनोगतातून 9 ऑगस्ट 1942 रोजीच्या ‌‘भारत छोडो' आंदोलनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. देशाला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असून प्रत्येकाने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापिका जयश्री भोसले यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, ‌‘भारत छोडो' आंदोलन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे राष्ट्रीय जीवनातील महत्त्व विशद केले. सारिका सोनटक्के यांनी 1857 च्या उठावापासून स्वातंत्र्यलढ्याच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतला. पांडुरंग देशमुख यांनी क्रांती दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशाच्या इतिहासातील परिवर्तनकारी पर्व असल्याचे सांगितले. रमण जाधव यांनी देशसेवा आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात इंद्रजीत काळूंके यांनी दहा विद्यार्थ्यांना दप्तर भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल श्रावणी पवार हिचा गौरव करण्यात आला. एक वर्षाची सेवापूर्ती केल्याबद्दल बालाजी मसलगे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच धाराशिव प्रशालेत नव्याने रुजू झालेल्या ज्ञानदेव जोंधळे, सारिका सोनटक्के, दीपाली रोकडे, गौरी माने आणि श्रीमती बुशरा तांबोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अण्णासाहेब जाधव यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विस्तृत ऐतिहासिक पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मनोगतातून स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला. स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी ‌‘हे असे आहे तरी पण हे असणार नाही' हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर धाराशिव प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‌‘ऐ वतन, ऐ वतन' हे देशभक्तिपर गीत सादर करत वातावरण राष्ट्रभक्तीने भारून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मसलगे यांनी केले. श्रीमती उषा माने यांनी आभार प्रदर्शनातून क्रांती दिनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांचे आभार मानले.


 
Top