वाशी (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे आय के एस हेल्थ कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत 165 स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या स्कूल किटची अंदाजे किंमत 1 लाख 10 हजार रुपये असून, इयत्ता पाचवीतील विद्यार्थी तसेच लक्ष्मीबाई जगदाळे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना या किटचे वितरण करण्यात आले. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विश्वजीत देशमुख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. थोरबोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल किट देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सेवा सहयोग फाउंडेशन व आय के एस हेल्थ कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘गुड टच आणि बॅड टच', वैयक्तिक सुरक्षितता आणि संकटाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, असे आवाहन त्यांनी केले. सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचे दुष्परिणाम, मानसिक ताणतणाव आणि व्यसनाधीनता यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये, तसेच सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याचा परिणाम लक्षात घ्यावा, असेही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी जपावी, असा संदेशही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना स्कूल किटच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवा सहयोग फाउंडेशन आणि आय के एस हेल्थ कंपनीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी विशेष कौतुक केले. सामाजिक संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. आर. थोरबोले, पर्यवेक्षक श्री. बी. एम. सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विश्वजीत देशमुख, श्री. डी. के. घुमरे सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. आर. थोरबोले यांनी केले. सूत्रसंचालन एस. एस. धारकर व जी. एम. देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती गिरी मॅडम यांनी मानले. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मिळालेली ही शैक्षणिक मदत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
