धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशीव येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेची जिल्हा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत राज्यातील व जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरण, गाव तेथे शाखा उभारणी आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसाला संघटनेत सक्रियपणे सहभागी करून घेत पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करून सामाजिक न्यायाची चळवळ अधिक प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही बैठक जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा महासचिव भाई फुलचंद गायकवाड (पाटील)यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध तालुक्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार विक्की वाघमारे यांची धाराशीव जिल्हा युवक अध्यक्ष, किशोरभाऊ वाघमारे यांची कळंब तालुका अध्यक्ष तसेच शंकर माने यांची धाराशीव शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतम बनसोडे (धाराशीव तालुका अध्यक्ष), संपत गायकवाड (धाराशीव तालुका उपाध्यक्ष), सूरज वाघमारे (कळंब तालुका युवक अध्यक्ष) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
