धाराशिव (प्रतिनिधी)-  पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आणि साहित्य संवर्धनाची जाणीव यांचा सुंदर मिलाफ घडवत अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, धाराशिव यांच्या वतीने एमआयडीसी परिसरातील वेणू ग्रीनरी येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. हिरवाई जपण्याचा संकल्प आणि शब्दांची समृद्ध परंपरा जोपासण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न अक्षरवेल महिला साहित्य मंडळाकडून नेहमीच होत असतो. दरवर्षी विविध सामाजिक संस्थांमध्ये अक्षरवेलच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते.

मंडळाच्या मार्गदर्शक कमलताई नलावडे आणि अध्यक्षा डॉ. सुलभा देशमुख आणि किरण देशमाने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मंडळाच्या सदस्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली. वृक्षारोपणानंतर रंगलेल्या साहित्यिक मैफलीने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मंडळातील सदस्यांनी स्वरचित कविता आणि कथा सादर करत शब्दांची मनोहारी उधळण केली. 

किरण देशमाने, डॉ. सुलभा देशमुख यांनी सादर केलेल्या गझलला छान प्रतिसाद मिळाला. सुनिता गुंजाळ यांनी सादर केलेल्या हास्य लघुकथेला हास्याचा खळखळाट झाला. त्याचबरोबर जयश्री फुटाणे,सविता गुंड यांच्यासह अनेकींनी कविता सादरीकरण केले. यावेळी अलका तावडे यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केल्याबद्दल त्यांचाही या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी डॉ. अनार साळुंके ,डॉ. विद्या देशमुख, वैजयंती तावडे,शिवनंदा माळी, सीमा नवले, विमल तावडे,अलका तावडे, साधना तावडे, विद्या डोईफोडे, प्राची नाईकवाडी यांनी विशेष प्रयत्न केले.


 
Top